गोंदिया - जिल्ह्यात युवतींच्या विनयभंगाच्या वाढत्या घटना पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गोंदिया येथील धोटे बंधू महाविद्यालयात तीन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तब्बल तीनशे विद्यार्थिनींना ऑस्ट्रेलिया आणि युएसएवरून आलेल्या चार प्रशिक्षकांनी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.
गेल्या महिन्यात गोंदियाच्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरूणीवर दोन तरूणांनी एकतर्फी प्रेमप्रकरणातून अॅसिड हल्ला केला होता. या तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी युएसए येथून केट मॅक कोलंबेव व सुली लुईप्के तर ऑस्ट्रेलियातून अजिंथा नायडू सुग्ननाम व डेव्हीड फ्लूड या प्रशिक्षकांना बोलावण्यात आले होते. विदेशी प्रशिक्षकांनी तिनशे विद्यार्थीनींना आपला बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींमधील भय दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम या प्रशिक्षणाद्वारे करण्यात आले.
हेही वाचा - निर्भया पथके झाली बंद, आता गोंदियातील हजारो शाळकरी मुली स्वत:च करणार आत्मसंरक्षण
गोंदिया शहरात झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर पहिल्यांदाच विद्यार्थिनींसाठी या कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आता जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये सुद्धा विद्यार्थिनींसाठी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन सरकारकडून करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.