गोंदिया - जिल्ह्यातील रुग्णालये अधिपरिचारकांवर (आरोग्य सेविका) बहुतांश अवलंबून असतात. यातीलच केटीएस व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आधीच डॉक्टरांची बोंबाबोंब आहे. सर्व कारभार अधिपरिचारकांवर अवलंबून आहे. अशात त्यांना गेल्या तीन वर्षांपासून नियमित वेतन देण्यात येत नाही. सहा महिन्यांपासून ते वेतनाविना काम करत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या संयमाचा बांध तुटला आहे. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता यांना वेतन देण्यात यावे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचे वेळोवेळी सांगीतले. लेखी निवेदनदेखील दिले. परंतु, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी केटीएस व बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील अधिपरिचारकांनी २७ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाची पूर्वकल्पनादेखील दिली होती, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तसेच मागील सहा महिन्यांपासून रखडलेले वेतन तात्काळ देण्यात यावे. गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या वेतनातील त्रूटी दूर करण्यात याव्यात, प्रत्येक वेळी दोन ते तीन महिने वेतन होत नाही हा प्रकार बंद करून नियमीत वेतन देण्यात यावे, वेतन बिलातील त्रुट्यातील प्रमाण कमी करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
रुग्णालयातील अधिपरिचारक आणि अधिपरिचारिका यांनी २७ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अशात रुग्णांच्या जिवाला कमी-जास्त झाल्यास ती जबाबदारी आपली राहणार नसून ती जबाबदारी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाची असेल, असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.