गोंदिया - जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी कोरोना सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, या रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्याची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेली होती. त्यावर पालकमंत्री देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा रुग्णालय प्रमुखांची कान उघडणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ७४२ लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. तर ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४३३ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले असले तरी ३२१ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी लोकांना जेवण तसेच इतर सुविधा बरोबर मिळत नाहीत. तर काही ठिकाणी चक्क औषधांचा तुटवडा असल्याची तक्रार रुग्णांनी थेट पालक मंत्र्याच्या मोबाईलवर संपर्क साधून केली होती.
दरम्यान पालकमंत्री अनिल देशमुख हे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचा आढावा घेताना कोव्हिड सेंटर मध्ये होणाऱ्या असुविधा आणि औषधांचा तुटवडा यावरून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हा रुग्णालयाचे सी एस यांची कान उघडणी केली. कोव्हिड रुग्णालयात असुविधा बाबतीत यापुढे तक्रार खपवून घेणार नाही. ही शेवटची संधी आहे, असे खडे बोल सुनावले.
त्या नंतर पत्रकारांशी सवांद साधला, त्यावेळी त्यांनी कोव्हिड रुग्णालयात योग्य त्या सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन दिले.