गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्कयातील चिरेखनी येथील मराठा रेजिमेंटमध्ये महेंद्र भाष्कर पारधी (वय 37) हा जवान कार्यरत होता. माञ, अरुणाचल प्रदेशामध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे महेंद्र याचा बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला ( Soldier Died In The Snowfall ) आहे. महेंद्र यांचे पार्थिव शरीर उद्या दुपारी त्यांच्या गावी येणार असून, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. महेंद्र हा भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये अरुणाचल प्रदेश (डिब्रुगड) येथे देशसेवा करत असताना शहीद झाला. ही दुःखद घटना मंगळवार, 22 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे ग्राम चिरेखनी शोकसागरात बुडाला आहे.
गाव शोकसागरात महेंद्र पारधी यांचा जन्म ग्राम चिरेखनी येथे सन 1985 मध्ये झाला. शिक्षणही ग्राम चिरेखनी व तालुका स्थळ तिरोडा येथे झाले. ते सन 2004 मध्ये बेलगाम मराठा सेंटरमध्ये (कर्नाटक) येथे हवालदारपदी रुजू झाले होते. या पदावरील कर्मचार्यांना 24 वर्षे सेवा द्यावी लागते व त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात. मात्र, महेंद्र पारधी यांच्या सेवानिवृत्तीला तब्बल 8 वर्षे बाकी असताना काळाने घाला घातला. त्यामुळे संपूर्ण चिरेखनी गाव शोकसागरात बुडाला आहे. उद्या गुरुवार, 24 मार्च रोजी त्यांचे पार्थिव ग्राम चिरेखनी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
![महेंद्र भास्कर पारधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-23mar-martyrsofgondiawhileservingcountry-10040_23032022185839_2303f_1648042119_606.jpg)
अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी शहीद महेंद्र पारधी यांचे वडील भास्कर पारधी यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. आई चित्रकला पारधी जिवंत आहेत. महेंद्र यांना तीन भाऊ आहेत. मोठ्या भावाचे नाव चंद्रशेखर पारधी, दुसर्या क्रमांकाचे शहीद महेंद्र, तिसर्या क्रमांकाचे सोनू उर्फ धनेन्द्र पारधी व चौथ्या क्रमांकाचे फनेंद्र पारधी अश्या चौघ्या भावंडांचे कुटुंब. यातील सोनू पारधी हे चिरेखनी गावाचे माजी उपसरपंच आहेत. तर महेंद्र यांना देशसेवा करण्याची आवड असल्याचे ते सैन्यात दाखल झाले होते. महेंद्र यांच्या पत्नीचे नाव गायत्री असून त्यांना जानव (वय 10) व शिवाय (वय 4) नावाची दोन मुले आहे. महेंद्र देशसेवे दरम्यान शहीद झाल्याने या चिमुकल्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले आहे. संपूर्ण कुटुंबात शोकाकुल वातावरण आहे. भाऊ शहीद झाल्याची बातमी मिळताच सोनू पारधी यांची प्रकृती खराब झाली होती. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अशी घडली घटना अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात सहा जवान पेट्रोलिंग करीत होते. त्यातील एक हवालदार महेंद्र पारधी होते. दरम्यान खूप जोरात अति हिमवृष्टी होत होती. सर्वत्र वातावरण व रस्ते अंधारले होते. सर्वांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. रस्ते सापडत नव्हते. अशात तूफानी व ढगाळ वातावरणात हे सैनिक अडकले होते. त्या हिमवृष्टी होत असलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून त्यांचा मृत्यू झाला. हे वृत्त तिरोडा तालुक्यात वार्यासारखे पसरले. अनेकांची ग्राम चिरेखनी येथे शहीद महेंद्र यांच्या घरी भेटी देणे सुरू केले.