गोंदिया - येथील रेल्वे पोलीस स्थानकावर गस्तीवर असताना गाडीतून उतरत असलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. सदर व्यक्तीची चौकशी करताना तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बॅगेची चौकशी केली असता त्याच्या बॅगेतून तब्बल सव्वा ८ किलो सोने सापडले. पोलिसांनी सदर संशयित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून या दोघांची विचारपूस सुरू असल्याची माहिती आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजता मुंबईवरून गोंदियाला विदर्भ एक्सप्रेस पोहोचल्यानंतर रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेकरीता गस्त घालत होते. त्यावेळी विदर्भ एक्स्प्रेसच्या बी २ एसी डब्यातून एक ५२ वर्षीय व्यक्ती उतरला. त्याच्या हालचाली संशयितरित्या आढळल्याने, बॅग घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला थांबवून त्याची विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे रेल्वे पोलीस त्याला ठाण्यात घेऊन गेले.
हेही वाचा - गोंदिया नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरूच
त्याच्या बॅगची तपासणी केली असता या बॅगेत असलेल्या ५ डब्ब्यांमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. याबाबत या व्यक्तीला विचारणा केल्यावर तो मुंबई येथील सराफा व्यापारी असून गोंदिया येथे हे दागिने घेऊन आल्याचे त्याने सांगितले. मात्र, बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची कोणतीही कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली आहे. तर, गोंदिया रेल्वे स्थानकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पकडण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - तब्बल सहा लाख रुपयांचा गांजा जप्त; छत्तीसगडचे ४ आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात