गोंदिया - शेतकऱ्यांची भागीदारी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यात जवळपास लाखांहून अधिक शेतकरी भागीदारी सदस्य आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या ठेवीवर बँकेचे कर्मचारी चांगलेच मालामाल होत आहेत. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अफरातफर केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुनी मोरगाव येथील बँक शाखेत ७ वर्षापुर्वी कोट्यवधीचा घोटाळा समोर आला होता. हे प्रकरण अद्यापही न्याय प्रविष्ट आहे. त्यातच सन २००८ ते २०१० या कालावधीत आपले आर्थिक हित साधून घेण्यासाठी पदाचा गैरवापर करून खोटे कागदपत्र तयार केले व ते खरे भासवुन बँकेत ७७ लाख ७० हजार ८०० रूपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे.
जिल्हा बँकेच्या सर्व शाखेचे संगणीकरण होण्याच्या पुर्वीचा हा प्रकार आहे. तसेच या कालावधी जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त होता. जिल्हा बँकेच्या शाखेचे संगणीकरण करून त्यात डाटा अपलोड करण्याचे काम सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घोळ केल्याचे अॅफिडेविट बँकेला लिहून दिले होते. तर तीन कर्मचाऱ्यांनी काही पैसेदेखील भरून दिले होते. मात्र, बँकेच्या शाखेचे ऑडिट व्हायचे असल्याने तक्रार करण्यास अडचण जात होती. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित होते.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाने या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. यातील सर्व बारिक गोष्टींची चौकशी केली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूपचंद मधुकर टेटे यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी शाखा व्यवस्थापक वाय. बी. ठाकुर, कॅशिअर दुर्गेश मस्के, आय. वा. बडोले, डि. पी. देशमुख आणि रोजंदारी कर्मचारी दुर्गेश रहांगडाले या आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची बँक आहे. या बँकेतून कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी व्यवहार करीत असतात. विशेषत: म्हणजे शेतकरी या बँकेत भागीदार आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेच्या भरवश्यावर कर्मचारी, अधिकारीच डल्ला मारत असल्याचा प्रकार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दुसऱ्यांदा उघडकीस आला आहे.