गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गोंदिया येथे आली असता, सेव्ह मेरिट सेव नेशन संघटनेने मुख्यमंत्र्यांना सभा स्थळी जात असताना त्यांची बस थांबवत त्यांना फलक दाखवले होते. या ७४ जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव गुन्हा दाखल
देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही गोंदिया येथे आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांची सभा इंदिरा गांधी स्टेडियम होती. गोंदियातील सेव्ह मेरिट सेव नेशनच्या संघटनेने मुख्यमंत्री सभा स्थळी जात असताना नेहरू चौकात त्यांची बस थांबवली. यानंतर मुख्यमंत्र्यांना फलक दाखवत खुल्या व इतर प्रवर्गालाही मेरीटच्या आधारावर ५० टक्के जागा देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या ७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शांत राहाण्याचे आवाहन केले असतानाही नारेबाजी करण्यात आली. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, या कारणास्तव या सर्वांवर गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...
गोंदिया : भाजपाच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे