गोंदिया - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीला गोंदियामध्ये चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. नागरिक अनेक बहाणे करून घराबाहेर पडत होते. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन जागे झाले. त्यामुळे गोंदियात कडक संचारबंदी आहे. वाहतुकीअभावी व बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकर्यांचा माल शेतातच सडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकरी थेट नागरिकांच्या घरी मोफत भाजीपाला पुरवत आहेत.
गोंदियात जिल्ह्यात कडेकोट संचारबंदी असल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला बाजारपेठेत जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी शेतातील भाजीपाला रस्त्यावरही फेकला. मात्र, आता शेतकरी आणि व्यापारी शेतातील भाजीपाला गावातील नागरिकांना मोफत वाटप करीत आहेत. दररोज जिल्ह्यातून ४० ते ४५ क्विंटल भाजीपाला मोफत नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे आता संचारबंदीत नागरिकांना भाजी खरेदीसाठी बाहेर जावे लागत नाही. कोरोना महामारीचे संकट आल्याने आपण समाजाचे काही देणे लागतो, ही सामाजिक भावना मनात असल्याने माणुसकी म्हणून स्वतःच्या शेतात पिकविलेला भाजीपाला देऊन माणुसकी जपण्याचा प्रयत्न केल्याचे मत या शेतकरी व व्यापार्यांनी व्यक्त केले.