गोंदिया - देवरी तालुका अंतर्गत येणाऱ्या केशोरी पोलीस अंतर्गत मौजा उमरपायली ते आंबेझरी जंगल परिसरात घातपात घडवून पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशान नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरून ठेवली होती. यासंदर्भातली माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर देवरी पोलिसांच्या सी ६० पथकाने जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. यादरम्यान स्फोटकं घडवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
हेही वाचा - गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ
विस्फोट घडवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त -
यात २३ जिलेटीन कांड्या, १ डायनामो, ६७ डिटोनेटर, ९० फूट इलेक्ट्रीक वायर, १ पांढ-या रंगाची प्लास्टीक पिशवीमध्ये अंदाजे ५ किलो ग्राम स्फोटक मिश्रण, १ गुलाबी रंगाची प्लास्टीक पिशवीमध्ये अंदाजे ५ किलो ग्राम स्फोटक मिश्रण, ५ वायर बंडल, २ प्लास्टीकचे सिरीज, ५० लिटर क्षमतेचा ड्रम तसेच इतर साहित्य त्या परिसरातून सर्च ऑपरेशन दरम्यान जप्त करण्यात आले.
केशोरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८९/२०२१ कलम ३०७ भादंवि सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा सहकलम १८, २०, २३ युएपीए अन्वये नक्षलवाद्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे करत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, सी-६० कमांडो पथक नवेगावबांध, देवरी, विशेष अभियान पथक, बीडीडीएस पथक गोंदियाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
हेही वाचा - पोलिसांना सापडली नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेली 16 लाखांची रोकड