गोंदिया - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात 144 कलम लागू असून संचारबंदी करण्यात आली आहे. त्यातच गोंदियात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे किराणा मालासह आता औषधेही ग्राहकांना घरपोच मिळणार आहे.
कोरोनावर आळा घालण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन नागरिकांना वेळोवेळी आवाहन करत असून आता नागरिकही प्रयत्न करताहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे खबरदारी म्हणून गर्दी टाळता यावी, यासाठी गोंदियातील मेडिकल स्टोर मालकांनी आता नागरिकांना घरपोच औषधे पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी ग्राहकांना मेडिकल स्टोर मालकांचा व्हाट्सएप नंबरवर, आपल्या औषधांची यादी द्यावी लागणार असून सोबत घरचा पत्ताही नमूद करावा लागेल. त्यानुसार मेडिकल स्टोरमधील एक व्यक्ती घरी येऊन ही औषधे घेऊन येणार आहे. या योजनेतून लोकांना सुरक्षित घरी औषधे मिळणार असून लोकांची गर्दी कमी करण्यास मोठी मदत मिळणार आहे.