गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना फायदा पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती अॅक्सिस बँकेत वळती केल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी केला आहे.
अॅक्सिस बँक ही खासगी बँक आहे. त्या बँकेला फायदा मिळवून दिल्यामुळे अमृता फडणवीस त्या बँकेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत. याविषयी सामाजिक कार्यकर्त्याने 'ईडी'कडे तक्रार केली आहे, त्या तक्रारीची ईडीने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून त्यांनी सर्व पोलीस विभागाचे खाते हे अॅक्सिस बँकेत वळविले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस ज्या आधी अॅक्सिस बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होत्या, त्या मात्र आता अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. या आधारावर नागौरी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.