गोंदिया- जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा व थंडीही जाणवत आहे. तसेच पावसानेही दांडी मारली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असून व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले व वृध्दांना या वातावरणाचा त्रास जाणवत असून शहरातील ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात ज्येष्ठ नागरिक व बालकांची गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ - दहा दिवसांपासून सोसाट्याचा वारा, ढगाळ वातावरण, अधूनमधून उन्हाचा तडाखा तर पहाटे थंडी जाणवत असल्याने पावसाळा आहे की हिवाळा हेच समजत नाही. मागील काही दिवसात कोरडी हवा, ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस झाला. यामुळे पूर्वी उष्ण असलेल्या वातावरणात बदल झाल्याने साथीचे रोग पसरत आहेत. सध्याही सातत्याने होणाऱया वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. बदलत्या हवामानामुळे मलेरिया, काविळ, टायफाईड, सर्दी, खोकला अशा जलजन्य व संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वातावरणातील बदलामुळे नागरिकांना त्रास होत असून थंडी, ताप, टायफाईड या सारख्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात नागरिक धाव घेत आहेत. सध्या शहरातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढली आहे. खासगी रुग्णालयाच्या ओपीडीही फुल्ल आहेत. प्रत्येक रुग्णालयास जत्रेचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात निर्माण झालेला बदल आणि दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. यामुळे ताप, उलट्या, पोटदुखी यासारख्या आजारात वाढ होत आहे. बालकांची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही स्वरूपाचा ताप असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.अन्यथा याचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.