गोंदिया - रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्या पूर्णपणे सेंद्रिय आहेत. ग्रामीण भागातील रानभाज्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होवून रानभाज्याची उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत एखादा प्रकल्प उभारून शेतकऱ्यांचा आणि त्या भागातील जनतेचा फायदा कसा होईल. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणारा रानभाजी महोत्सव महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. गोंदिया कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
'आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त'
कोरोनाशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राजनभाज्या उपयुक्त असून, त्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल. रानभाज्यामंध्ये औषधीक गुणधर्म व शरीराला आवश्यक असणारे पोष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, काटवेल, आदी शंभरावर रानभाज्यां ठेवण्यात आल्या होत्या.