गोंदिया - सारस पक्ष्याला प्रेमाचे प्रतिक आणि शेतकऱ्यांचा मित्र समजले जाते. गोंदिया जिल्ह्यात तर सारसला त्यांचा गौरव म्हणतात. जिल्ह्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर आठवडाभरापासून सारस संमेलन भरले आहे. यासंमेलनात २४ ते २६ तरुण सारस पक्षांचा समावेश आहे. या सारस संमेलनामुळे लुप्त होत असलेल्या सारसच्या संख्येत वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू आहे संमेलन -
या पूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये सारस पक्षांचे संमेलन घडून आले होते. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१७-१८ मध्येही असे घडले होते. आता पुन्हा दोन ते तीन वर्षांनी मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर सारस गोळा झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून २४ ते २६ सारस याठिकाणी दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सारस तरुण आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सारस हा पक्षी एकट्या गोंदिया जिल्ह्यातच आढळतो.
हळूहळू वाढत आहे सारसची संख्या -
सारस हा पक्षी सध्या लुप्त होत चालला आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात गोंदिया जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके सारस पक्षी होते. गेल्या काही वर्षात गोंदियामध्ये सारसची संख्या थोड्या फार प्रमाणात वाढली आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी व सारस प्रेमी मोलाचे काम करत आहेत. आता तर सारस संमेलनच भरले आहे. या संमेलनात सारस आपला जोडीदार निवडतो, असे म्हटले जाते. त्यामुळे या पक्ष्यांच्या जोड्या जुळून येत्या काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कसा आहे सारस पक्षी?
सारस हा पक्षी जगातील मोठ्या उडणाऱया पक्षांच्या गटात मोडतो. एका सारसचा मृत्यू झाला तर त्याचा जोडीदार देखील मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतिक समजले जाते. पूर्ण जगभरात सारस पक्षाच्या आठ जाती आहेत. त्यापैकी भारतात चार जाती आढळतात. पांढऱया रंगाच्या या पक्षाच्या मानेवर लाल आणि काळा पट्टा असतो.