गोंदिया - लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत. या विरोधात आज, ५ फेब्रुवारीला गोंदिया शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात देखील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तसेच गोरेगाव तालुका येथे जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदार विजय राहंगडले यांनी मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले. तसेच तिरोडा येथील वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात माजी मंत्री राजकुमर बडोले यांच्या नेतृत्वात वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना १६ तास शेतीसाठी वीज द्यावी या प्रमुख मागण्यांना यावेळी माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांनी केल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. साधारण पीकासाठी १६ तास वीज लागते. मात्र, या ठिकाणी ८ तास वीज दिली जाते. आमच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण विजेच्या संदर्भात घेण्यात आले होते. जिथे ज्या वर्षी दुष्काळ पडला तेव्हा शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने बिल वसूल केले नाही. मात्र या सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विजेचे बिल दिले आहेत. आकारणी जास्त केली आहे व सक्तीने वीज बिल वसुली करण्याबाबत शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळे हे थांबवण्यात यावे याकरिता व शेतकऱ्यांना १६ तास वीज देण्यात यावी या मागणीला घेऊन आज गोंदिया जिल्ह्यात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.