गोंदिया - दिवसेंदिवस इंधनाच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिक त्रस्त झाले आहेत. या दरम्यान नागरिकांना दिलासा देणारे जैविक इंधनाचा एक प्रकल्प गोंदियात कार्यन्वित होणार आहे. गोंदियाचे सुपुत्र महेंद्र ठाकूर संचालक असलेल्या रूची बायोकेमिकल्सने गेल्या वर्षभरात गवतापासुन जैविक इंधन(गॅस) तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आता ते या प्रकल्पातून गॅस निर्मिती करून तो वाहनांना पर्यायी इंधन म्हणून उपलब्ध करून देणार आहेत.
देशात दररोज पेट्रोल-डिझेल आणि गॅस यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे़, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही हे पदार्थ हानीकारक आहेत. त्यामुळे सर्व देश पर्यायी इंधन शोधत आहे. त्याप्रमाणेच इंधन निर्मिती करण्यास महेंद्र ठाकूर यांना यश आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच लवकरच ठाकूर हे गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे 25 एकर जागेवर जैव प्रक्रिया करून जैव इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहेत. यासाठी ठाकरू तब्बल 50 कोटी रुपये खर्च करत आहेत.
गेल्या दोन दशकांपासून अग्रीकल्चर बायोटेकोलॉजी क्षेत्रात काम करणारी गोंदियाची रूची बायोकेमिकल्स या कंपनी मुंबईच्या मिरा क्लिनफ्युल या नामवंत कंपनीच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीच्या सहाय्याने हा प्रकल्प सुरू करत आहे. त्यासंदर्भातील करार ही त्यांच्यात झाला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडल्यानंतर प्रकल्प उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. येत्या वर्षभरात हा जैवइंधनाचा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती महेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.
गवतापासून तयार होणार इंधन-
विशेष म्हणजे हे जैविक इंधन गवतापासुन तयार करण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया तालुक्यातील प्रत्येक गावात गवताची लागवड केली जाणार आहे. या व्यतिरिक्त गाव व शहरातील ओला कचरा, पाला पाचोळ या जैव इंधन निर्मिती वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे पेटंट जर्मन टेक्नोलॉजी सहाय्याने बायोरिएक्टरमध्ये गॅस निर्मितीसाठी होणार आहे. या प्रकल्पात निर्माण करण्यात येणारा शुध्दीकरणानंतर दुचाकी, कार, मालवाहतूक करणारी वाहने, इत्यांदीसाठी वापरता येईल. तसेच या गॅसचा वापर घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यात येणार आहे. भविष्यात या प्रोजेक्ट चा विस्तार होऊन जैविक इंधनावर विमानही चालवणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रदुषण विरहीत प्रकल्प-
विशेष म्हणजे, उत्पादन प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याने शिवाय वापरल्यावर पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा कमी प्रदूषण होणार आहे. तेव्हा सर्व शेतकर्यांनी या मोहिमेत सहभागी होवून तालुका व जिल्ह्याला समृध्द तसेच प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संचालक महेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
या प्रकल्पाला गवत पुरविण्याचे काम शेतकरी करणार असून त्यासाठी एक शेतकरी उत्पादक कंपनी गठीत करण्यात आली आहे. शिवाय या कामात रोजगार ही भरपूर मिळणार असल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी सुद्धा वाढणार आहेत. त्यामुळे पारंपरिक धान पिकाला आता फाटा देत नगदी पिक असलेल्या गवताच्या शेतीकडे आता जिल्ह्यातील शेतकरी वळणार आहेत.