गोंदिया - देशभरात कोरोना व्हायरसची दहशत सुरू आहे. त्यामुळे गावखेड्यातून केवळ एकच चर्चा एकायला मिळते, ती म्हणजे कोरोनाचे काय झाले. असेच गोंदिया जिल्ह्यतील सडक-अर्जुनी तालुक्यातील किशोरी या नक्षलग्रस्त गावातील रहिवासी अरूण मस्के समाजशिल कार्यकर्ता, अशी त्यांची गावात ओळख आहे. त्यांनी कोरोना विषाणूची वेशभुषा धारण करून या आजाराबद्यल नागरिकांमध्ये जनजागृती करत संपूर्ण गावात कोरोना बदल कसे लढता येणार हे गावकऱ्यांना सांगितले. त्यामुळे गावात हा चांगलाच कुतूहलाचा विषय झाला होता.
कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेवून व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहेत. या उपक्रमात आपला खारीचा वाटा असावा म्हणून शासनाने घोषीत केलेल्या संचारबंदीचा कोणत्याही नागरिकांनी उल्लंघन करू नये, यासाठी कोरोना विषाणुची प्रतिकृती आपल्या डोक्यावर तयार करून गावात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याचा संदेश देत आहेत.
कोरोना विषाणू महामारीचा वाढत्या प्रभावाने गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समाजशील कार्यकर्ता म्हणून गावात ओळख असणारे अरूण मस्के यांनी शासनाच्या उपायोजना म्हणुन कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी डोक्यावर कोरोनाची प्रतिकृती तयार करून जनजागृती सुरू केली आहे.