गोंदिया - शेतकऱ्याला मंजूर सिंचन विहिरीत बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव सादर करण्याकरता लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंता व कनिष्ठ सहायकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उपविभाग (लघु पाटबंधारे) कार्यालयात करण्यात आली. कनिष्ठ अभियंता शशिकांत पुंडलिक काळे व कनिष्ठ सहाय्यक वसंत भिवा भोंडे, अशी आरोपींची नावे आहेत.
अर्जुनी मोरगाव येथील फिर्यादी शेतकऱ्याला मागेल त्याला सिंचन विहिर या योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. सिंचन विहिरीचे खोदकामही पुर्ण झाले. त्यानंतर विहिरीमध्ये बोअरवेलचे काम बाकी होते. विहिरीच्या संपूर्ण कामाकरीता मंजुर निधीपैकी उर्वरित बोअरवेलची रक्कम विभागाकडून प्राप्त झाली नव्हती. याबाबत शेतकरी विचारपूस करण्यासाठी अर्जुनी मोरगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयात गेला. परंतु, यावेळी आरोपी कनिष्ठ अभियंता शशिकांत पुंडलिक काळे याने मंजूर बोअरवेलच्या बिलाचे प्रस्ताव तयार करून पंचायत समिती कार्यालयात पाठविण्यासाठी २ हजारांची लाच मागितली.
तक्रारकर्त्या शेतकऱ्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार गोंदिया लाचलुचपत विभागाकडे केली. तक्रारीची शहनिशा करत अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालय (ल. पा.) येथे सापळा रचण्यात आला. दरम्यान, कनिष्ठ अभियंता काळे यांनी लोकसेवक पदाचा दुरूपयोग करीत पंचासमक्ष सहकारी कनिष्ठ सहायक वसंत भोंडे याच्या माध्यमातुन २ हजाराची लाच स्विकारली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून दोंघांविरुद्ध अर्जुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.