गोंदिया- तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत धामनगाव मार्गावरील विद्युत खांबाला दुचाकी आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली. नेपाल कटरे (वय 53 रा. मुरपार रावणवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, नेपाल कटरे हे काल आपल्या दुचाकी क्र. (एम.एच 35/0899) ने गावाकडे जाण्यासाठी धामनगाव मार्गाने जात होते. दरम्यान नेपाल कटरे यांच्या दुचाकीचे संतुलन बिघडले व दुचाकी अनियंत्रित होऊन विद्युत खांबाला धडकली. या घटनेत नेपाल कटरे यांचा जागीच मृत्यू झाला. नेपाल कटरे हे प्रसिद्ध समाजसेवक असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.