गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाले आहे. मजुरांना योग्य मोबदला आणि सोयी सुविधा पुरविल्या जातात कि नाही, याची पाहणी करण्यासाठी रोजगार हमी समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी स्वतः बांधावर जाऊन पाहणी केली आहे.
राज्यात यावर्षी १ फेब्रुवारी पासून मनेरगा अंतर्गत "मागेल त्याला काम" या तत्वावर कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यातही मनरेगाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर ६ लक्ष ५० हजार जॉब कार्डधारक मंजूर असून मनरेगाच्या कामावर यापैकी ९७ हजार मजूर कामे करित आहेत. मात्र त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत मजुरांनी मनरेगाचे अध्यक्षांकडे केली आहे. तर दुसरीकडे मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात कुशल आणि अकुशल पद्धतीचे कामे केली जात आहे.
तरतुदीत कपात -
राज्य सरकारतर्फे मजुरांना वर्षभर कामे दिली जावी, असे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहेत. मागील वर्षी देशातील बजेटमध्ये ६९ हजार कोटीची कामे मजूर करण्यात आली होती. मात्र यावर्षी बजेटमध्ये कपात करीत ५९ हजार कोटींचे कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत १० हजार कोटींच्या कामांची कपात झाली आहे. तर जवळपास २० हजार कोटीचे कामे एकट्या महाराष्ट्रात करणार असल्याचा संकल्प मनरेगाचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.
मजुरी वाढवावी -
मनरेगाच्या कामावर एका पुरुषाने १० बाय १० अंतर आणि १ फूट खोलीचे खोदकाम केल्यास आणि खोदकाम केलेल्या अंतरावरून १० मीटर लांब माती नेऊन फेकल्यास त्याला मोबदला म्हणून फक्त २७० रुपये दिले जात आहे. या खोदकामाला जवळपास दीड दिवस म्हणजे १२ तास काम करावं लागते. मात्र त्या प्रमाणात मजुराला मजुरी मिळत नसल्याचे मजूर सांगतात. महिलांना कमीत कमी २०० रुपये आणि पुरुषाला कमीत कमीत ३०० रुपये दरदिवशी मिळावे अशी मागणी मजुरांनी रोहियोच्या अध्यक्षांकडे केली आहे.
वाढीव भाडे गरजेचे -
तर दुसरीकडे मनरेगाच्या कामावर काम करीत असलेल्या मजुरांना कामावर घेऊन येणाऱ्या साहित्याची झीज म्हणून एका पुरुषाला २ रूपये तर हत्यार भाडे म्हणून २ रुपये आणि पिण्याच्या पाण्याकरिता १ रुपये दिले जाते. तसेच महिला मंजुराना २ रुपये हत्यार भाडे आणि पिण्याच्या पाण्याचे १ रुपये दिले जात आहे. ९० दिवस सलग कामे केलेल्या मजुराला शासनाच्या वतीने विविध १९ योजनांचा लाभ दिला जातो. तसेच ही सर्व माहिती रोजगार सेवकांच्या माध्यमातून मजुरांना दिली जाते कि नाही याचा आढावा देखील रोहियोच्या अध्यक्षांनी घेतला आहे.