गोंदिया - पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला इजा (स्क्रचेस) पोहोचल्याने सुरक्षेच्यादृष्टीने कार्यरत असणाऱ्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले. गोंदीया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने सुरक्षिततेबाबत कुठलीही हयगय चालणार नसल्याच्या सुचना विनीता साहू यांनी दिल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने साहू यांनी हा निर्णय घेतला.
पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या वाहनाला पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहासमोर सुरक्षेच्या दृष्टीने गार्डच्या संरक्षणामध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये पोलीस हवालदार पंकज पांडे, चमनलाल नेताम, पोलीस नाईक सुरेश चव्हाण, पोलीस शिपाई कैलाश कलाधार आणि रोहीत चव्हाण, पोलीस शिपाई छोटेलाल बिसेन यांचा समावेश आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांचे वाहन संरक्षणात असताना वाहनांवर अज्ञातांनी स्क्रॅचेस मारल्याचे निदर्शनास आले. पोलीस कर्मचारी तैनात असताना असे झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना शिस्तबद्ध पोलीस विभागास ही न शोभणारी व बेजबाबदारपणा असल्याचे दिसून आले.
विनीता साहू यांनी त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे अर्जुनी मोरगाव येथील पोलीस ठाण्यात राहावे लागणार असून दररोज सकाळी व संध्याकाळ हजेरी पटावर स्वाक्षरी करावयाची आहे. निलंबित कर्मचारी निलंबन काळात खासगी नोकरी अथवा धंदा केल्यास त्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा अन्वये गैरवर्तवणूक समजण्यात येईल व ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ही ठरतील असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. या कारवाईने कर्तव्यावर असताना हयगय करणाऱ्या पोलीस कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत.