गोंदिया - पोपटाची तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तींना देवरी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१९ पोपट जप्त करण्यात आले. या आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली.
हेही वाचा - नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
हे पोपट छत्तीसगढमधून आदिवासींकडून विकत घेऊन नागपुरात विक्री करण्यासाठी नेण्यात येत होते. देवरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कमलेश बछाव रविवारी रात्री तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील शिरपूर गावाजवळ पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांनी रायपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव टाटा इंडिका (सीजी 04-एचसी 0208) गाडीला तपासणीसाठी रोखले असता त्यांना गाडीत पोपट आढळून आले.
हेही वाचा - 1993 ब्लास्टमधील मुख्य आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद
या प्रकरणी कार चालक मोहम्मद असलम शेख फरीद आणि त्याचा सहकारी मोहम्मद जाबीर मोहम्मद महेबूब याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आदिवासी लोकांकडून अवैधरित्या पोपटांची खरेदी करून जास्त भावाने नागपूरच्या बाजारात विक्री करीत असल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २०० रुपये दराने या पोपटांची विक्री व्हायची, अशी माहिती या तस्करांनी दिली.