गोंदिया - सालेकसा तालुक्यातील साखरी-टोला गावातील दोन मैत्रिणीने विहिरीत उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीला वाचविण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री घरी उशिरा आल्यानंतर घरच्यांनी रागवले म्हणून एकीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तर दुसरीने तिच्या आत्महत्येला मला दोषी ठरवतील, या भीतीने तिनेही विहिरीत उडी मारली. मात्र, ग्रामस्थांनी तिचा जीव वाचवला आहे. या दोन्ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडल्या आहेत. रोशनी सुखराम चित्रीव (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. तर शुभांगीनी देवचंद बिसेन (वय 17) असे बचावलेल्या तिच्या मैत्रिणींचे नाव आहे.
सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या साखरी टोला परिसरातील कवडी येथील रोशनी व शुभांगीनी यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. रोशनी आणि शुभांगी या दोघीही शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ठाणा येथील तीन मित्रांसोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या. मात्र, त्यांना रात्री घरी यायला बराच उशीर झाला. त्यानंतर रोशनीच्या भावाने तिला रागवले आणि या बाबतची माहिती नागपूर येथे राहत असलेल्या आई-वडिलांनाही दिली. त्यावर आई-वडिलांनी तिला समजावले.
रोशनीला या घटनेचा राग आला आणि तिने रविवारी सकाळी रागाच्या भरात घराजवळून काही अंतरावर असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर या घटनेची शुभांगीला माहिती मिळाली आणि ती घाबरली. आता रोशनीच्या आत्महत्येला सगळे तिलाच जबाबदार धरतील या भीतीने तिनेही गावातील शासकीय विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या लोकांनी तिला वाचविले.
या दोन्ही घटनेप्रकरणी सालेकसा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रोशनीच्या आत्महत्येचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.