गोंदिया - बाल व माता मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या 'प्रधानमंत्री मातृवंदना योजने' अंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ४३८ महिलांना लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना १० कोटी २२ लाख २३ हजार रूपये वाटप करण्यात आले आहे. तर, अधिकाअधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रलंबित प्रकरणांवर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागानुसार, पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या ५३ टक्के महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात आला.
आरोग्य विभागाच्यामते प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत जानेवारी २०१७ पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत २७ हजार ७३९ महिलांना लाभ द्यायला पाहिजे होता. परंतु, जिल्ह्यात आत्तापर्यंत २५ हजार ४३८ अशा ९२ टक्के महिलांनाच लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पहिल्या बाळाच्यावेळी ५ हजार रूपये देण्यात येतात. ग्रामीण भागातील गर्भवती महिलेला गर्भावस्थेत स्वत:ची काळजी घेण्यासाठी व संतुलीत आहार मिळावा या उद्येशातून ३ टप्यात ही रक्कम देण्यात येते. गर्भवतीच्या नोंदणीच्या वेळी १ हजार रुपये, ६ महिने पूर्ण झाल्यावर २ हजार रूपये, प्रसुतीनंतर बालकाची जन्म नोंदणी व पेंटावैलेंट वॅक्सीनचे ३ डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर २ हजार रूपये देण्यात येतात.
हेही वाचा - बिल ऑनलाईन देण्यासाठी लाच; धान खरेदी केंद्राच्या अध्यक्षासह संगणकचालक एसीबीच्या जाळ्यात
सन २०१९-२० मध्ये ५ हजार ३४० गर्भवती महिलांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यात आले होते त्यानुसार या लाभार्थ्यांना ३ कोटी ४४ लाख ३४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, अशा लाभार्थ्यांची संख्या १ हजार ४१ आहे. त्यामुळे पहिल्या टप्यातील एक हजार १९७ तर दुसऱया टप्यातील २९५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्षांसह नवनिर्वाचित आमदारांचा प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार