गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा-चुरडी मार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून श्रीधर हरिदास ठेंगे (वय ३७), असे मृताचे नाव आहे. रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकच्या चालकाने बेजबाबदारपणे ट्रक चालवल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.
तिरोडा-चुरडी मार्गावर नाल्याचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावर ट्रक चालकाने दुचाकीस्वार श्रीधर हरीदास ठेंगे यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद तिरोडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तिरोडा परिसरात रस्ता बांधकामासह विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून वर्दळीच्या रस्त्यांवर बांधकाम होत आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे निर्माणाधीन रस्ता बांधकाम आणि इतर विकास कामांच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात येत नाही. किंबहुना प्रगती पथावर असलेल्या कामाच्या संदर्भातही फलक लावण्यात येत नाही. त्यामुळे होणाऱ्या अपघातात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. आणखी किती जीव घेणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.