गडचिरोली - जिल्ह्याच्या महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील कालेश्वर येथील मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाच्या कन्नेपल्ली पंपहाऊसमध्ये क्रेन कोसळून अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातात मजूर म्हणून काम करत असलेले गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा येथील सात मजूर गंभीर जखमी झाले. सध्या या मजुरांची प्रकृती स्थिर आहे.
तेलंगणा सरकारच्या महत्वकांक्षी मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाच्या पंप हाऊसमध्ये काम सुरू असताना क्रेनची दोर तुटून मजूर खाली फेकले गेले. या घटनेत अन्य ५ मजुरांनाही मार लागला. या मजुरांना गंभीर जखमी अवस्थेत वारंगळला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमी सर्व मजूर गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली पेंटीपाका गर्कापेठा येथील रहीवासी आहेत. सध्या या मजुरांची प्रकृती स्थिर असली तरी ते गंभीर जखमी असल्याने त्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.