गडचिरोली - सिझेरियन करताना चक्क लघवीची नस कापल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २६ मे २०१७ रोजी घडला. त्यामुळे पीडित महिलेला जीवघेण्या वेदनांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्याला ५० लाखांची नुकसान भरपाई देऊन संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिला करत आहे. या मागणीसाठी महिलेने २० फेब्रुवारीपासून रुग्णालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सुशोगीता मुकेश बेडोले (रा. परसटोला ता. अर्जुनी जि. गोंदिया) असे पीडित महिलेचे नाव आहे. सुशोगीता यांना सिझेरियन प्रसूतीसाठी कुरखेडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सिझेरिन असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. २६ मे २०१७ रोजी त्यांची सिझेरियन प्रसूती झाली. डॉ. चोखांदरे व डॉ. बोकडे यांनी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेदरम्यान लघवीची नस कापली गेली. मात्र, याबाबत पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे लघवीची नळी बसवण्यात आली. मात्र, ती नळी दर महिन्याला बदलावी लागत आहे. यामुळे महिलेला आर्थिक तसेच मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्याला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० फेब्रुवारीपासून महिलेने जिल्हा सामान्य रुग्णालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे व नागपूर येथून आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे सांगितले. मात्र, महिला उपोषणावर ठाम असून जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर कारवाई व आपल्याला नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. तर यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची विचारणा केली असता, महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गत पीडित महिलेला शस्त्रक्रिया करून देणार असलेल्या सांगितले.