गडचिरोली - शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला ( Gadchiroli People Oppose Encrochment ) जोरदार विरोध होत आहे. हा जिल्हा उद्योगविरहित जिल्हा असून पोटभरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केली आहेत. ही फुटपाथ दुकाने अत्यंत बळजबरीने आणि एकतर्फी, द्वेषभावनेतून काढण्यात येत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत, ही कारवाई थांबविण्यात यावी, यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे नगर परिषदेवर ( Wender Agitation Against Encrochment Action ) मोर्चा काढण्यात आला.
'या' आहेत मोर्चेकरांच्या मागण्या -
राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर परिषद आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण हटाविणे क्रमप्राप्त असले, तरी महामार्ग विभागाच्या नियमापलीकडे जावून बळजबरीने आणि द्वेषपूर्ण भावनेने ही कारवाई नगर परिषदेने केली आहे. कारवाईमुळे गरीब लोकांसाठी एक आणि शहरातील मोक्याच्या जागा बळकवणाऱ्या श्रीमंतांना एक असे वेगवेगळे नियम आणि कायदे असल्याचा आरोप होत आहे. कोरोनाने आधीच हतबल फुटपाथ दुकानदारांना उपासमारीच्या खाईत लोटले जात आहे. नगर परिषद, गडचिरोलीने कारगील चौकात बांधलेले १०० दुकानगाळे शहरातील फुटपाथ धारकांना 'ड्रा' पध्दतीने द्यावे. यात १०% गाळे नक्षलपिडीत कुटुंबीय फुटपाथ धारकांना द्यावे. गडचिरोली जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने शहरातील अतिक्रमण धारक फुटपाथ धारकांना पर्यायी जागेची व्यवस्था करुन उपजिविकेची हमी देण्यात यावी. गडचिरोली शहरातील चारही प्रमुख महामार्गावर सर्वीस रोड तयार करण्यात यावा, अशी मोर्चेक-यांची प्रमुख मागणी होती.