गडचिरोली - जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हरीनगर येथे १५ दिवसांत दोघांचा मृत्यू झाला. दोघांनाही मूत्रपिंड आणि यकृतासंबंधी आजार होते. तसेच या गावात अनेक वर्षांपासून याच आजाराने अनेकजण दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या ७ जुलैला गावातील राकेश विश्वनाथ बिश्वास (वय ३२) या तरुणाचा मूत्रपिंड आणि यकृतीसंबंधी आजाराने मृत्यू झाला. तसेच २४ जूनला याच गावातील सुशीला प्रफुल्ल मंडल (६५) या महिलेचा देखील मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला होता. तिच्या पतीला देखील मूत्रपिंडासंबंधी आजाराने ग्रासले आहे. तसेच गावातील तपन हिमांशू सरकार (४५) हा रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे उपचार घेत आहे. त्याची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली. इतकेच नाहीतर गुरुदास हरिदास बवाली (४८) ही व्यक्ती देखील याच आजाराचा शिकार असून आठवड्यातून दोनदा गडचिरोली येथे उपचारासाठी जातात. आतापर्यंत या आजाराने अनेकांचे जीव गेले. तसेच गावात आणखी बरेच रुग्ण असून त्यांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.