गडचिरोली - हेमलकसा येथील लोकबिरादरी रुग्णालयात २३ व २४ फेब्रुवारी शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या २६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या उभयत्यांच्या प्रेरणेने डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्यांच्या पुढाकाराने २३ व २४ फेब्रुवारीला लोकबिरादरी रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ वर्धा व लोकबिरादरी रुग्णालय हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात थायराइड, हायड्रोसिल, हर्निया इत्यादी व्याधीने ग्रस्त २६ रुग्णावर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेसाठी डॉ. पार्थ सारथी, डॉ. गोडे, डॉ. पाटणकर डॉ. विष्णू, डॉ. रॉय, डॉ. देशमुख, डॉ. मिनाक्षी, डॉ. समीर, डॉ. कोंडा, डॉ. निलोफर बिजली, डॉ. लोकेश तमगिरे आदींनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
यापूर्वी १८ ते २० जानेवारीला पहिले शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात गर्भाशय पिशवी, जन्मजात हर्निया, बर्न कौन्ट्राक्चर, मुत्राशय खडा, फाटलेले ओठ, थायराईड, विविध प्रकारच्या गाठी, हर्निया, स्तनगाठी, मुळव्याध, मुत्रमार्गाचे आंकुचन, कर्करोग, मोतीबिंदू आदी व्याधींनी ग्रस्त १४७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्यांना नवजीवन प्राप्त करुन दिले होते. या वर्षातील हे दुसरे शस्त्रक्रिया शिबिर आहे.
दरवर्षी ३ शस्त्रक्रिया शिबिरे घेऊन लोकबिरादरी रुग्णालय रुग्णांना जीवदान देते. शिबिरासाठी बबन पांचाळ, संध्या येम्पलवार, गणेश हिवरकर,जगदीश बुरडकर, प्रकाश मायकरकार, शारदा ओक्सा आदींनी सहकार्य केले.