गडचिरोली - विकासाच्या दृष्टीने राज्याचे तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी.अलेक्झांडर यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अध्यापही अपेक्षित असा विकास साधता आला नाही. परिणामी नदी पलिकडच्या जारेगुडा गोलागुडा परिसरातील नागरिकांना आजही कित्येक वजनाची ओझी घेऊन याच मार्गाने ये-जा करावी लागत आहे.
भामरागड वन विभागाच्या विश्राम गृहाजवळील पामुलगौतम नदीवरील लोखंडी पूल बांधण्याची नदीपलीकडच्या परिसरातील नागरिकांची खूप जुनी मागणी आहे. परंतु, प्रशासनाने याला कधी गांभीर्याने घेतले नाही. या नदीपलीकडच्या जारेगुडा, गोलागुडा, जुव्वी, दर्भा, मर्दमालेंगा, इतलवार, भटपार आदी गावांच्या नागरिकांना इकडून 2 किमी अंतरावर असलेले भामरागड अगदी जवळ पडते. मात्र, नदीवर पूल नसल्याने नागरिकांना दुसऱ्या रस्त्याने जाताना धोडराज, मेडपल्ली पुलावरून १५ ते १६ किमीची फेरी मारुन भामरागडला जावे लागते. तसेच बैलगाडीशिवाय इथे दुसरे कोणते साधनही नाही. तर, पावसाळ्यात दुथडी भरलेल्या जुव्वी नाल्यामुळे संपर्क तुटतो. त्यामुळे डोंग्याच्या (होडी) सहय्याने धोकदायक प्रवास करावा लागतो.
येथील नागरिकांना पहाटे उठून दररोज मजुरीसाठी भामरागडला कामासाठी यावे लागते. त्यामुळे, भामरागडला येणे सोयीस्कर होण्यासाठी पामुलगौतम नदीवर विश्रामगृहाजवळ लोखंडी पूल बांधण्याची मागणी येथील तत्कालीन आदिवासी लोकप्रिय नेता दिवंगत मालू कोपि बोगामी यांनी केली होती. लोखंडी पूल बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शासनाकडे याचा पाठपुरावाही केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही. परिणामी येथील नागरिकांना आजही कित्येक वजनाची ओझी घेऊन याच मार्गाने अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
हेही वाचा - "नक्षली कारवायांवर नजर ठेवण्यासाठी पाचशे कोटींचे ड्रोन"
जारेगुडा येथील शेतकऱ्यांना धान विकण्यसाठी दिवसभर कसरत करावी लागते. जारेगुडाचे शेतकरी धान विक्री करताना धान बैलगाडीने नदीकाठावर आणून तेथून पलीकडे डोंग्याने पार करून घेऊन जातात. त्यानंतर, डोंग्यावरुन (होडी) नदीच्या टेकडीवर एकेक पोते त्यांना खांद्यावर लादून आणावे लागले. १० पोते घेऊन भामरागडपर्यंतचे २ किमीचे अंतर गाठण्यासाठी त्यांना दिवसभर कसरत करावी लागते. मात्र, पामुलगौतम नदीवर लोखंडी पूल बांधल्यास हे अंतर आणि दिवसभराची कसरत यातून त्यांची सुटका होईल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - "विरोधात बोलणार्यांना तत्कालीन सरकारने शहरी नक्षलवादी ठरवलं"