गडचिरोली - गावातील शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. मात्र, गावातील मुलांना शिकवण्याची धडपड आदिवासी ग्रामस्थांना आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला आणि चक्क श्रमदानातून बांबू आणि गवतापासून अतिशय देखणी अशी 'अभ्यास कुटी' उभी राहिली. आज ही अभ्यास कुटी इतर शाळांसाठी मॉडेल ठरत आहे. 'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा प्रत्यय जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आदिवासींच्या दराची गावात आला.
दराची हे गाव घनदाट जंगलात वसले आहे. या गावात जाण्यासाठी धड रस्ता देखील नाही. त्यामुळे दुचाकी जाणेही अतिशय जिकिरीचे ठरते. या गावाकडे प्रशासनाचे तर नेहमी दुर्लक्षच राहिले आहे. मात्र, येथील ग्रामस्थांना आपल्या पाल्यांना शिकवण्याची तळमळ आहे.
गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत. मात्र, इमारत जीर्ण झाल्याने त्यामध्ये बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पुढाकार घेत फक्त दोन दिवसत बांबू आणि गवतापासून अतिशय देखणी अशी अभ्यास कुटी निर्माण केली. या अभ्यास कुटीसाठी ग्रामसभेने निधी दिला. तसेच अनेक ग्रामस्थांनी श्रमदानामधून एका खांबावर अभ्यास कुटी उभारली.
'अभ्यास कुटी'च्या श्रमदानासाठी गावातील महिलांचाही तेवढाच सहभाग होता. येथे कार्यरत शिक्षक वसंतराव गुरुनुले व राजेश्वर कुनघाडकर यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना गावप्रमुख लच्चूराम उईके आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामू उईके यांची साथ मिळाली.
हे वाचलं का? - तब्बल 82 वर्षांपासून सुरू आहे अखंड वीणा वादन, अख्खे गाव जोपासतंय वीणेची परंपरा
अभ्यास कुटी निर्माण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा अनेकांनी गावकऱ्यांची स्तुती केली. थेट जिल्हाधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांच्या श्रमदानाची दखल घेत शिक्षक राजेश्वर कुनघाडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलून घेत शाळेबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांनी शाळेला भेट देण्याचे आश्वासित केले.
गावकऱ्यांच्या श्रमदानातून निर्माण झालेली 'अभ्यास कुटी' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. लवकरच जिल्हाधिकारी शिखर सिंग शाळेला भेट देणार असून त्यांच्या हस्ते अभ्यास कुटीचे लोकार्पण होणार आहे. एकूणच निसर्गमय वातावरणात उभी राहिलेली 'अभ्यास कुटी' इतर शाळांसाठी मॉडेल ठरेल, यात शंका नाही.