गडचिरोली - जिल्ह्यात बाहेरून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळ्या दोन क्वारंटाईन सेंटर व चामोर्शीमधील एका क्वारंटाईन सेंटरमधील व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्यात आले आहे.
संबंधित रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचा तपशील घेतला जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे. संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांना 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश दिल्यानंतर आरोग्य विभागाकडून संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार व कार्यालये 100 टक्के सुरू होते. मात्र, मुंबईतून आलेल्या प्रवाशांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
सध्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.