गडचिरोली - अहेरी तालुक्यातील पेरमिली वासियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासठी बुधवारी नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे अहेरी-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पेरमिली परिसरात 30 ते 40 गावांचा समावेश असून या गावांमध्ये विविध समस्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. तालुका मुख्यालयात जाण्यासाठी तब्बल 40 किमी जावे लागते. शासकीय आणि खाजगी कामाकरता लोकांना अडचण येते. त्यामुळे पेरमिली गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.
गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात स्वतंत्र विदर्भ, अहेरी जिल्हा निर्माण करून पेरमिलीला तालुक्याचा दर्जा द्याव, 33 के. व्ही. उपकेंद्र स्थापन करावे, को-ऑप बँकेच्या शाखेची निर्मिती करा, महाविद्यालय आणि आयटीआयची स्थापना करा, महसूल मंडळाचे उद्घाटन करून नायब तहसीलदार देण्यात यावा, गावात 4-G मोबाईल सेवा सुरू करावी, शासकीय आश्रम शाळेत कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावे, कचलेर व हिंदभट्टी गावात विद्युत पुरवठा करण्यात यावा, गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. सकाळपासून चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, दुपारनंतर अधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.