गडचिरोली - नक्षलवाद्यांनी पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून गडचिरोलीतील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. मात्र, वेंगणूरवासीयांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत १३ कि.मी प्रवास करत आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावत लोकशाहीवर विश्वास दाखविला.

हेही वाचा - अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?
वेंगणूर येथील ग्रामस्थांनी नेहमीच लोकशाहीला पाठिंबा दिला असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण कधीच बळी पडणार नसल्याचे सांगितले. यावेळी १३ कि.मी चा जंगलातून तसेच वाटेत येणाऱ्या कन्नमवार जलाशयातून बोटीने प्रवास करत ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिला आणि वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. गडचिरोली पोलीस दलातर्फे बुथवरच रेगडीचे प्रभारी अधिकारी खापरे यांनी वेंगणूर ग्रामस्थाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला. नक्षलवाद्यांना न जुमानता वेंगणूर ग्रामस्थांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याच्या कृतीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले असून सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.