गडचिरोली - जिल्हा मुख्यालयासह तीन तालुक्यांना जोडणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील देवदा-रेगडी या मार्गावरील दिना नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिकांना आजही नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अतिशय बिकट बनत असून जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करीत नागरिकांना रस्ता पार करावा लागतो.
देवदा- रेगडी परिसरातील तीनही तालुके तसेच जिल्हा मुख्यालयापर्यंत पक्का रस्ता आहे. फक्त दिना नदीवर पुलाचे बाधकांम झाले नसल्याने मागील अनेक वर्षापासून नागरिक त्रस्त आहेत. या मार्गाने एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यातील नागरिक प्रवास करतात. मात्र, पुलाअभावी जिल्हा मुख्यालयाचे अतंर लांब पल्ला गाठून पूर्ण करावे लागते. अशात काही नागरिक जीव धोक्यात घालून १२ महिने धोका पत्करून दिना नदीपात्रातून ये-जा करत असतात.
विशेष म्हणजे, पावसाळ्यातही अनेक नागरिक जिल्हा मुख्यालय, तालुका मुख्यालय व रेगडी येथून छत्तीसगडला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, नदीवरील पुलाअभावी या मार्गावर एस.टी.महामळडांची कोणतीही सेवा सुरु नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाअभावी नागरिकांना पावसाळ्यात लांब पला गाठून ये-जा करावी लागते. अनेकदा अतंर कमी करण्याच्या नादात जीव धोक्यात घालून पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने घातली जातात. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.