गडचिरोली- कोरोना संकटामुळे राज्यभरात ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षण नॉट रिचेबल झाले आहे. यावर उपाय म्हणून दुर्गम भागातील शिक्षकांनी ऑफलाईन व्हिडिओ शिक्षणाचा भन्नाट पर्याय शोधला आहे. राज्यातील पहिल्याच या भन्नाट उपक्रमामुळे गडचिरोलीच्या दुर्गम गावातील विद्यार्थी आता ऑफलाईन व्हिडिओच्या माध्यमातून टीव्हीवर धडे गिरवत आहेत.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेला गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुका कोरची. स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही तालुक्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण जगात थैमान घातलेला कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा बघता त्यांना शाळेतून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 4g आणि 5g च्या आजच्या युगात कोरची तालुक्यात मात्र 2g चा पण लाभ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यायचे तरी कसे? हा प्रश्नच होता. त्यामुळे आपण काहीतरी वेगळे करू जेणेकरुन तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होता कामा नये, म्हणून पंचायत समिती कोरचीचे गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी काही तंत्रस्नेही शिक्षकांची सभा घेऊन ऑफलाईन व्हिडिओची संकल्पना मांडली. मग काय, लागले सर्व शिक्षक कामाला आणि अवघ्या पंधरा दिवसात प्रथम सत्राचे संपूर्ण विषयाचे पाठ्यक्रम तयार झाले.
'शिक्षा आपल्या दारी' या संकल्पनेने ऑफलाईन व्हिडिओ 116 गावांमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून पोहोचवून प्रत्येकी तीन ते चार विद्यार्थ्यांमागे एक पेन ड्राइवचे वाटप करण्याचे निर्देश प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सचिवाला दिले. त्यामुळे आता विद्यार्थी टीव्हीवर धडे गिरवत आहेत. महाराष्ट्रातील ऑफलाईन व्हिडिओचा हा पहिलाच उपक्रम असून सर्व स्तरावरुन या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमांमध्ये गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.