गडचिरोली - आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक योजनांमध्ये जवळपास शंभर कोटींचा घोटाळा झाला. यामध्ये अधिकाऱ्यांसह अनेक मंत्र्यांचा सहभाग आहे. हा घोटाळा दाबण्यासाठीच केवळ 10 आदिवासी मुलांना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील 8 लहान संगणक संस्था चालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल करताना कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही. मोठ्यांना अभय देऊन लहान संस्थाचालकांना गुंतवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातील संगणक संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत केला.
आदिवासी विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या एमएससीआयटी प्रशिक्षणात घोळ केल्याच्या कारणावरून गडचिरोलीचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्यासह 8 संगणक संस्थाचालकांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात 21 डिसेंबरला फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार समोर येतात गुन्हे दाखल झालेल्या आठही संगणक संस्थाचालकांनी गुरुवारी गडचिरोलीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
माहिती देताना नासिर हाशमी म्हणाले, आदिवासी विकास विभागाने 2004 मध्ये अनुसूचीत जाती व जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी रितसर जाहिरात दिली. त्यानंतर आमच्याशी करारनामा केला. या कराराला अधीन राहून आम्ही दहा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा विद्यार्थ्यांचे जवळपास 22 हजार रुपये आम्हाला डीडीद्वारे मिळाले. याबाबत संपूर्ण माहिती प्रकल्प अधिकारी कार्यालयाला यापूर्वीच देण्यात आली. त्याच काळामध्ये आदिवासी विकास विभागात अनेक घोटाळे गाजले. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश गायकवाड यांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. मात्र, समितीने कुठलीही शहानिशा न करता केवळ कार्यालयात बसून अहवाल सादर केला आहे.
आम्ही दहा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती प्रकल्प कार्यालयाला यापूर्वीच दिली आहे. मात्र, समितीच्या दबावाखाली येथील सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी 8 संगणक संस्थाचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. आमच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे शंभर कोटींच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गुन्हे दाखल करण्यापूर्वी पोलिसांनीही पूर्ण कागदपत्रांची शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र, तसा कुठलाही प्रकार घडला नाही. मोठे अधिकारी व मंत्र्यांना वाचविण्यासाठी लहान संगणक संस्था चालकांवर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुयोग कॉम्प्युटर आरमोरी, क्रिस्टल कॉम्प्युटर कुरखेडा, शाईन कॉम्प्युटर कोरची, कॉम्प्युटर पॉईंट चामोर्शी, राज कॉम्प्युटर आष्टी, नेटवर्क कॉम्प्युटर गडचिरोली, क्रिस्टल कॉम्प्युटर कोरची, संकल्पसिद्धी बहुउद्देशिय विकास संस्था गडचिरोलीचे संगणक संस्था चालक उपस्थित होते.