गडचिरोली - अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्तीकॅम्प मधील ( Kamalapur Elephant Camp ) हत्तींना गुजरात राज्यातील प्राणी संग्रहालयात हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कमलापूर येथील हत्तीकॅम्पला प्रत्यक्ष भेट ( MLA Dharmarao Baba Atram Visited Kamalapur Elephant Camp ) दिली. त्यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून पाहणी केली.
हत्तीकॅम्प हलविणार नाही -
कमलापूर हत्तीकॅम्प मधील हत्तींना अंबानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुजरात राज्यातील प्राणी संग्रहालयात हलविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्राम यांनी हत्तीकॅम्प राज्य सरकारची मालमत्ता असून केंद्र सरकारचा अधिकार काय? असा प्रश्न उपस्थित केला. सिरोंचा वनविभागातील कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्तीकॅम्प हे अहेरी विधानसभा क्षेत्रात येते. जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन क्षेत्र आहे. याठिकाणी आवश्यक निधी देऊन पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत असून त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा सुरू आहे. बैठकीत कमलापूर येथील हत्तीकॅम्प येथून का हलविणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यावर कॅम्पमधून हत्तींना हलविले जाणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
पर्यटन क्षेत्र विकसित करणार -
सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वन खाते आहे. पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा निवेदन दिले आहे. याठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून हत्ती या ठिकाणाहून हलविले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.