गडचिरोली - फसवणुकीचा बदला घेण्याच्या भावनेतून आपण नक्षल चळवळीत जात असल्याचे पत्रक एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एटापल्ली येथे ही घटना घडली. पत्रकात नावे असणाऱ्या पाच जणांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तर संदेश टाकणारा तरुण हा सध्या बेपत्ता आहे. त्यामुळे तो नक्षल चळवळीमध्ये गेला तर नसेल ना, या शंकेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
![gadchiroli missing youth letter news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5838847_gad.jpg)
बुधवारी 22 जानेवारीला एका 28 वर्षीय तरुणाने एटापल्ली व्यापारी संघटनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर एक पत्रक टाकले. त्यामध्ये पाच जणांचे नाव लिहिले आहे. यांच्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. माझा संपूर्ण व्यवसाय ठप्प पडला आहे. मी बरबाद झालोय. मी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यामुळे मी आता नक्षलवाद्यांमध्ये दाखल होण्यासाठी जात आहे. तिथे जाऊन मी सर्वांना जीवे मारेन, असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे एटापल्लीमध्ये एकच खळबळ उडाली.
पत्रकात नावे असणाऱ्या पाचही जणांना धक्काच बसला आहे. या घटनेमुळे त्यांना व त्यांच्या परिवारातही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून पोलिसात एक तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला त्या व्यक्तीपासून वाचवावे आणि आम्हाला सुरक्षा द्यावी, असा अर्ज पोलिसात देण्यात आला.
पत्रक टाकणारा व्यक्ती भातपीक आणि चिकनचे सेंटर चालवतो. तसेच इतरही कामे करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यामुळे तो बेपत्त तरुण गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तो नलक्षवाद्यांमध्ये गेला असेल, तर पत्रात नावे असलेल्या लोकांना त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्याने फक्त भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे का? याचा तपास करणे हे देखील पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.