गडचिरोली - आपली राजकीय कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातून सुरू करणारे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे. जिल्ह्यात आदिवासी बांधवांना धार्मिक मान्यतेमुळे दारूचा वापर करण्याची परवानगी आहे. त्यामुळे केवळ गैरआदिवासींना दारूबंदी का, असे म्हणत दारूबंदीमुळे कथित समाजसेवकांनाच फायदा झाल्याची बोचरी टीका त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली.
दारूबंदीमुळे कोट्यवधी रुपयांची अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. जिल्ह्यातील दारूबंदीचा फायदा केवळ व्यसनमुक्तीच्या नावावर कथित समाजसेवकांना होत आहे. दारूबंदी हा उपाय नव्हे, असे सांगत अनेक राज्यांनी याबाबत केलेला प्रयोग फसला असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. जे निवडणूक लढत नाहीत त्यांना जमिनीवरील वास्तव कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्पादन शुल्क विभागाने नेमलेली उच्चस्तरीय समिती दारूबंदीचे फायदे, तोटे यावर अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान जिल्ह्यात दारूबंदीवरून राजकीय वादळ उठले असून दारूबंदीच्या समर्थनात 386 गावांनी दारूबंदी हवीच, दारुबंदी अधिक मजबूत करा, असे प्रस्ताव शासनाला पाठवले आहे. तर अनेक राजकीय नेत्यांनी दारुबंदी हटवा अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - गोंडवाना विद्यापीठ : पहिल्या पेपरचे यशस्वी आयोजन; 10 हजार 685 विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा