गडचिरोली - पालकमंत्री तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही रुग्णालयांना भेटी देत रुग्णालयाचे फायर ऑडिट तसेच इलेक्ट्रॉनिक ऑडिट तत्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांच्या अचानक भेटीने आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
भंडारा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली आगीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर निश्चितच कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
मंगळवारी जिल्हा शिवसेनेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर होते. सायंकाळपर्यंत मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर लगेचच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला तसेच महिला व बाल रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले.
हेही वाचा - कोरोना लस सर्वांना मोफत द्या, संसदीय समितीची शिफारस