गडचिरोली - राज्यात अतिसंवेदनशील मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळेस काँग्रेस उमेदवार बाजी मारणार की भाजप गड राखणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागली आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून २ निवडणुका झाल्या. 2009 ला काँग्रेसचे मारोतराव कोवासे तर 2014 ला भाजपचे अशोक नेते या मतदारसंघातून निवडून आले. यापूर्वी गडचिरोली-चंद्रपूर असा लोकसभा मतदारसंघ होता. तर चिमूर हा वेगळा लोकसभा मतदारसंघ होता. गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हंसराज अहिर तर चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसची सत्ता होती. चिमूर मतदारसंघातूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार हे तीनदा निवडून आले होते. तर 1999 व 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नामदेव दिवटे व महादेवराव शिवणकर निवडून आले होते.
2009 ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर गडचिरोली-चिमूर असा नवा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघात गडचिरोली, अहेरी, आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील ३ विधानसभा क्षेत्र तसेच ब्रह्मपुरी व चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर अनुसूचित जमातीसाठी हा क्षेत्र राखीव झाला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांचा पराभव करीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे या मतदार संघातून निवडून आले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव करून भाजपचे अशोक नेते मोदी लाटेत विजयी ठरले होते. मात्र, आता चित्र वेगळे आहे.
दोन्ही पक्षाकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव पक्के मानले जात आहे. तर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी तीन डॉक्टरांमध्ये रस्सीखेच असून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र विस्तीर्ण असून या क्षेत्रात आदिवासी नागरिक सर्वाधिक आहेत. तसेच नक्षलवाद्यांचाही प्रभाव आहे. या क्षेत्रात बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्या तरी मोठे सिंचन प्रकल्प नाही. मराठी, हिंदी, गोंड, माडिया व तेलुगु भाषा या क्षेत्रात प्रचलित आहे. हा भाग विदर्भ, छत्तीसगडसह तेलंगणाचा संस्कृती संगम आहे. विदर्भाची काशी असलेल्या श्री श्रेत्र मार्कंडादेव, चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक मुद्दे आहेत. मात्र सामान्य माणसांना नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा धाक आणि शासनाच्या न पोहोचलेल्या योजनांमुळे हा क्षेत्र आजही मागास आहे. त्यामुळे या क्षेत्रात भाजप आपले गड राहणार की काँग्रेस बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.