गडचिरोली - जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कायम ठेवावे, या मागणीसाठी गडचिरोलीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन करत विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद कायम ठेवा, अशा घोषणाही दिल्या.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना संकट आल्याने पालकमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आला. चार दिवसांपूर्वी राज्य शासनाने परिपत्रक काढून पालकमंत्रिपद पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी इंदिरा गांधी चौकात विरूगिरी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
विजय वडेट्टीवार हे स्थानिक नेते असल्याने त्यांना जिल्ह्यातील समस्यांबाबत जाण आहे. तात्पुरता कार्यभार स्वीकारताच त्यांनी अनेक कामांसाठी निधी दिला. त्यामुळे नक्कीच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. या आंदोलनात युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बागेसर, मनोज कांबळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
हेही वाचा - मुस्लिम आमदारांनी पवारांकडे मांडल्या व्यथा, बकरी ईदच्या कुर्बानीसाठी नियम शिथील करण्याची मागणी