गडचिरोली - आरमोरी पोलिसांनी रविवारी सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली. आरमोरी शहरातील तंबाखू ठोक विक्रेता सलीम माखानी याच्या गोदामावर धाड टाकून 30 लाख 17 हजारा खर्रा, विक्रीसाठी आणली जाणारी सुगंधीत तंबाखू जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेला तंबाखू अन्न प्रशासन विभागाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
राज्य शासनाने सुगंधीत तंबाखू विक्रीवर बंदी घातली असली तरी चोरट्या मार्गाने मजा तंबाखू छत्तीसगड आणि अन्य ठिकाणावरून आणून अधिक दराने तो पान ठेलेधारकांना विकला जात आहे. या व्यापारात अनेक मोठे आसामी गुंतले असल्याचे आरमोरी पोलीसांनी केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा
गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरात सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. दररोज या व्यवसायात लाखोंची उलाढाल होत आहे. बाहेरील काही ठोक विक्रेते गडचिरोली शहरातील किरकोळ विक्रेत्यांना तंबाखूचा मोठा पुरवठा करतात. किरकोळ विक्रेते थेट पान ठेलेधारकांना ही तंबाखू विकतात. याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.