गडचिरोली - शहरातील फुले वार्डातील कुक्कटपालन करणाऱ्या व्यावसायिकाच्या काही कोंबड्या मृत झाले होते. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे मंगळवारी (दि. 19 जाने.) आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी फुले वार्ड येथील संबंधित व्यावसायिकाच्या घराचे प्रक्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्या ठिकाणापासून एक किलोमिटरचा परिसर संसर्ग क्षेत्र तर 10 किलोमिटर क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
गडचिरोली शहरात चिकन विक्रीवर बंदी
फुले वार्ड, गडचिरोली येथील संबंधित व्यावसायिकाच्या बाधित क्षेत्रापासून 1 ते 10 किलोमिटर क्षेत्रातून कुक्कुट पक्ष्यांची बाहेर जाणारी वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन, अंडी, कुक्कुटखत यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. बाधित क्षेत्र वगळून 1 ते 10 किलोमिटर क्षेत्रात निरोगी कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्यास मुभा असणार आहे. तसेच सर्वेक्षण क्षेत्रातंर्गत तालुका गडचिरोली हद्दीतील कोटगल, इंदाळा, कनेरी, पुलखल, मुडझा, नवेगाव, सेमाना, वाकडी, कृपाळा, मसेली, शिरपूर चेक, विहिरगाव, चांदाळा, बोदली, मेंढा, बामणी, जेप्रा, मुरखळा, उसेगाव, मजोरी, दिभना, राजगट्टा चेक, राजगट्टामाल, खरपुंडी, माडे तुकुम, गोगाव, कुऱ्हाडी, कोंढाणा, चुरचुरा व साखरा ही सर्व गावे पुढील आदेश हाईपर्यंत सर्व्हेक्षण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहेत.
जिल्हा व तालुकास्तरावर बर्ड फ्ल्यू संक्रमण नियंत्रणासाठी समितीची स्थापना
बर्ड फ्ल्यूबाबत होणारा संसर्ग रोखण्यासाठी व त्यावर आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्यासाठी समित्यांची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यामध्ये अध्यक्ष हे जिल्हाधिकारी तर सदस्य म्हणून मोठ्या अधिकाऱ्यांचा तसेच इतर महत्वाच्या विभाग प्रमुखांचा समावेश आहे. तसेच तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली विविध तालुका अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
'त्या' जीवित व मृत कोंबड्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने
बर्ड फ्ल्यू हा आजार केवळ पक्ष्यांमध्ये होत असतो. हा संसर्ग मनुष्यामध्ये होण्याचे प्रमाण फारच दुर्मिळ असते. तरीसुध्दा खबरदारी आणि बर्ड फ्ल्यूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी फुले वार्डातील कुक्कुटपाललातील मृत कोंबड्या व इतर जीवित कोंबड्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
हेही वाचा - गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोलीमध्येच होणार, विद्यापीठाची माहिती