गडचिरोली - अपक्ष उमेदवार डॉ. किरसान एन. डी. यांनी गडचिरोली - चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. गुरूवार हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
गडचिरोली - चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक महादेवराव नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव दल्लुजी उसेंड हे रिंगणात आहेत. याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे हरिश्चंद्र नागोजी मंगाम व आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे देवराव मोनबा नन्नावरे, वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे असे एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
जिल्ह्यात मतदारजागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूक विषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे अॅपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्यावतीने आज गडचिरोली येथे मोटारसायकल मतदार जनजागृती रॅली काढली. यामागे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी हा उद्देश आहे.