गडचिरोली - देवरी-गडचिरोली-सिरोंचा या 353-सी राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली ते आष्टीपर्यंत या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. 18 महिन्यात काम पूर्ण करायचे असल्याने गडचिरोली ते चामोर्शीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण आहेत.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकापासून विज्ञान महाविद्यालयापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे. तर विज्ञान महाविद्यालय ते शिवणी गावापर्यंत जंगल असल्याने येथे फोर लाईन डांबरीकरण करण्यात येत आहे. हे काम साई कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूरला देण्यात आले आले असून शिवनी गावापासून चामोर्शी शहरापर्यंत पूर्ण रस्ता काँक्रिटीकरण आहे. काँक्रीटीकरणाचे काम औरंगाबाद येथील ए.जी. कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले. काम 18 महिन्यात पूर्ण करायचे असल्याने कंत्राटदाराने गोविंदपूर गावापासून तळोधीपर्यंतचा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून मुरूम पसरवला आहे.
मार्ग वर्दळीचा असल्याने रस्त्यावरील मुरमामुळे प्रचंड धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून या मार्गाने जाणारे दुचाकीस्वार बसगाडीला पसंती देताना दिसतात. या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग असल्याने काँक्रिटीकरण मंजूर झाले होते. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.