गडचिरोली - छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अबुजमाड जंगल परिसर हा नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. या ठिकाणी गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 जवानांनी नक्षलवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनु ऊर्फ भुपती याने उभारलेल्या तळावर कारवाई केली. यामध्ये 1 नक्षलवादी ठार झाला आहे. उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या उपपोलीस ठाणे लाहेरी हद्दीपासून 40 किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात जवान अबुजमाड जंगलात अभियान राबवत होते. यावेळी पोलिसांनी हल्ला चढवून एका नक्षलवाद्यास ठार केले. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांवर एके-47 व एलएमजी सारख्या रायफलने गोळीबार केला आणि मृत नक्षलवाद्याचा मृतदेह आपल्यासोबत घेवून गेले.
सी-60 जवान परतत असताना नक्षलवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील घमंडी व लाहेरीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कठीण परिस्थीतीत न डगमगता अतिदुर्गम भागातून अभियान राबवित असलेल्या जवानांनी नक्षलवादयांचा हमला परतवुन लावला. यावेळी जवानांनी 200 ते 300 संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांना जेरीस आणले.