गडचिरोली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कालच नक्षलवाद्यांनी धमकीचे पत्र पाठवत गडचिरोलीतील विकास प्रक्रियेपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, नक्षल धमकीची पर्वा न करता पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत दाखल झाले. अतिदुर्गम धोडराज पोलीस मदत केंद्रात जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवांनाना दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. तसेच शांतता सुव्यवस्था राखून जिल्ह्यात विकासात्मक वातावरण तयार करण्यासाठी जवानांचा त्याग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या भेटीत केले.
नक्षलविरोधी पोलीस दलाच्या जवानांसबत संवाद साधताना गडचिरोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकास प्रक्रियेत गतिमान करण्याचा सरकारचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी जवानांसोबत फराळ केला. अतिशय विपरीत परिस्थितीत जिल्ह्यातील शांततामय वातावरण कायम ठेवण्यासाठी जवानांनी केलेल्या बलिदान व प्रयत्नांचा त्यांनी भाषणातून गौरव केला.
हेही वाचा - दिल्लीतील चित्र 2024 ला पूर्णपणे बदलेल - संजय राऊत
आता 'या' हत्तींबाबत निर्णय घेतला जाणार -
गडचिरोली जिल्हयात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होवू शकतो का याबाबत पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. यावेळी हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत व जागा तयार करावयाची असल्यास त्याकरिता कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी सादरीकरण केले. त्यानुसार आता या हत्तींबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले.